ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. फुफ्फुसाचा संसर्ग झाल्याने त्यांच्यावर गेल्या दीड महिन्यांपासून उपचार सुरू होते.
शिवकालीन इतिहास हा त्यांचा अभ्यासाचा, संशोधनाचा, आस्थेचा विषय. नव्या पिढीला इतिहासाकडे पाहण्याची नवी दृष्टी देणाऱ्या इतिहास संशोधकांमध्ये डॉ. जयसिंगराव पवार यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते.
डॉ. जयसिंगराव पवार हे विद्यार्थ्यांमध्ये अत्यंत लोकप्रिय इतिहास लेखक. 'मराठ्यांचा इतिहास' हा त्यांच्या अभ्यासाचा आणि संशोधनाचा विषय. मराठ्यांचा इतिहासाचा सांगोपांग अभ्यास असणारे आज अगदी बोटावर मोजता येतील इतकेच संशोधक आहेत. त्यामध्ये डॉ. जयसिंगराव पवार यांचे स्थान वरच्या दर्जाचे होते. छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज, महाराणी ताराबाई, महाराणी येसूबाई, मराठ्यांचे स्वातंत्र्ययुद्ध या विषयांवर साधने मिळविताना जयसिंगराव पवार यांना अनेक नवीन साधने मिळाली.
राजर्षी शाहू महाराजांचे कार्य, त्यांची धोरणे समाजापर्यंत नेण्यासाठी त्यांनी आयुष्यभर काम केले. एका व्रताप्रमाणे त्यांनी हे कार्य केले. इतिहासाचा भाग असलेल्या करवीर संस्थापिका ताराराणी यांचे चरित्रलेखन करून त्यांच्या कर्तृत्वाची ओळख करून देण्याची महत्त्वाची कामगिरी त्यांनी केली. त्याहीपुढे त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे, ते राजर्षी शाहू महाराजांच्या चारित्राला न्याय देण्यामध्ये. हे काम त्यांनी कृतज्ञतेच्या भावनेतून केले आहे. दादोजी कोंडदेवांसंदर्भाने महत्त्वाची मांडणी डॉ पवार यांनी केली आणि मराठा इतिहासाकडे पाहण्याची नवी दृष्टी दिली. पंचगंगा तिरी या नावाने डॉ. जयसिंगराव पवार यांनी आत्मचरित्र लिहिले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏 www.great-indian com
आणि www.vijayjob.in