भावपूर्ण श्रद्धांजली
जागतिक कीर्तीचे पर्यावरणशास्त्रज्ञ आणि पर्यावरण संरक्षण चळवळीचे मार्गदर्शक डॉ. माधव गाडगीळ (वय ८३) यांचे बुधवारी रात्री उशिरा पुण्यातील खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या निधनाने देशाच्या पर्यावरणीय विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
डॉ. गाडगीळ यांनी जैवविविधता संवर्धन, लोकसहभागातून नैसर्गिक साधनसंपत्तीचे व्यवस्थापन आणि शाश्वत विकास या विषयांवर मोलाचे संशोधन व लेखन केले.
डॉ. गाडगीळ यांचा जन्म २४ मे १९४२ रोजी पुण्यात झाला. त्यांचे शालेय शिक्षण पुण्यातच झाले. तत्कालीन पुणे विद्यापीठ आणि मुंबई विद्यापीठ येथून त्यांनी जीवशास्त्रातील पदवी शिक्षण घेतले. हार्वर्ड विद्यापीठातून त्यांनी मॅथेमॅटिकल इकॉलॉजी या विषयात पीएच.डी. मिळवली. ते हार्वर्ड विद्यापीठाच्या आयबीएम संगणन केंद्राचे तसेच उपयोजित गणितशास्त्र विभागाचे फेलो होते. १९७३ ते २००४ या कालावधीत ते बेंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये प्राध्यापक होते. त्यांनी तेथे 'सेंटर फॉर इकॉलॉजिकल सायन्सेस'ची स्थापना केली.
हार्वर्ड विद्यापीठात त्यांनी जीवशास्त्राचे अध्यापन केले. तसेच अमेरिकेतील स्टॅनफर्ड आणि बर्कले विद्यापीठांमध्ये ते पाहुणे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पत्नी डॉ. सुलोचना गाडगीळ या पुण्यातील भारतीय उष्णप्रदेशीय हवामानशास्त्र संस्थेत हवामानशास्त्रज्ञ होत्या. काही महिन्यांपूर्वी त्यांचेही निधन झाले.
केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने २०१० मध्ये पश्चिम घाटाच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी डॉ. माधव गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. या समितीने पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रांचा सविस्तर अभ्यास करून अहवाल सादर केला होता. हा अहवाल पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने मैलाचा दगड मानला जातो. पश्चिम घाटात पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रे (इको-सेन्सिटिव्ह झोन) निश्चित करण्याची तसेच खाणकाम, उत्खनन यांसारख्या हानिकारक प्रकल्पांवर बंदी घालण्याची शिफारस या अहवालात करण्यात आली होती. त्यामुळे या अहवालावर व्यापक चर्चा झाली आणि काही राज्यांकडून त्याला विरोधही झाला.
यानंतर पश्चिम घाटाच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने डॉ. कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली दुसरी समिती नेमली होती. मात्र, डॉ. गाडगीळ यांनी प्रत्यक्ष पश्चिम घाटात फिरून पाहणी करून हा अहवाल तयार केला होता. त्यामुळे या अहवालातील शिफारशींबाबत जनजागृती करण्यासाठी लोकचळवळ उभी राहिली.
विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संरक्षणाची जाणीव निर्माण व्हावी यासाठी त्यांनी शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच प्राध्यापकांच्या साहाय्याने देशातील जैवविविधतेचे सर्वेक्षण व संवर्धन या विषयांवर विविध अभिनव प्रयोग केले. भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था, भारतीय विज्ञान अकादमी तसेच पर्यावरणाशी संबंधित विविध राष्ट्रीय समित्यांमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
डॉ. माधव गाडगीळ यांच्या निधनाने देशालाच नव्हे, तर जागतिक पातळीवरील एक नामवंत पर्यावरणशास्त्रज्ञ आपण गमावल्याची भावना विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून व्यक्त होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏 www.great-indian com
आणि www.vijayjob.in