मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

महत्वाच्या लिंक IMP

रविवार, ९ जुलै, २०२३

राजर्षी छत्रपती शाहू महाराज

 लोककल्याणकारी राजर्षी छत्रपती शाहू महाराज !

(२६ जून १८७४ - ६ मे १९२२)


             छत्रपती शाहू महाराजांचा जन्म २६ जून, १८७४ रोजी कसबा बावडा येथे झाला.  १८८४ साली ते छत्रपतींच्या कोल्हापूर गादीवर दत्तक म्हणून आले.  १८८४ ते १८९४ या दहा वर्षात त्यांनी राजकोट आणि धारवाड या ठिकाणी उच्च शिक्षण पूर्ण केले.  १८९४ साली त्यांचा राज्याभिषेक झाला.

                                   

      राज्याभिषेकानंतर त्यांनी आपल्या राज्याचा दौरा केला. डोंगरदऱ्यात राहणाऱ्या कष्टकरी, श्रमकरी, शेतकरी, वंचित, उपेक्षित, भूमिहीन प्रजाजनांचे दुःख पाहून त्यांचे मन हेलावले,  छत्रपतीच्या अंतःकरणामध्ये  प्रचंड वात्सल्य होते.  ते जसे स्वाभिमानी होते, तसेच ते प्रेमळ होते.  आपल्या राज्यात अमूलाग्र बदल करण्याचा संकल्प त्यांनी केला. राज्यारोहणामुळे शाहू महाराजांचा सत्कार पुण्यातील सार्वजनिक सभेने आयोजित केला होता,  त्यादरम्यानच पुण्यात हिंदू-मुस्लिम दंगल झालेली होती आणि या दंगलीला टिळकाची मदत होती. टिळक हे वयाने शाहू महाराजांपेक्षा वीस वर्षांनी मोठे होते.  सत्कार प्रसंगी शाहू महाराज म्हणाले, "हिंदू-मुस्लिमांनी एकोप्याने राहावे, भांडण करू नये" 

शाहू महाराजांची वयाच्या विसाव्या वर्षीची प्रगल्भता ही त्यांच्या महान व्यक्तिमत्त्वाची प्रचिती आहे.   टिळक दंगल घडविण्याच्या बाजूचे तर शाहू महाराज शांतता प्रस्थापित करणारे होते.

                        

      शाहू महाराजांनी आपल्या राज्यात शिक्षणाचा प्रसार केला. प्राथमिक शिक्षण सर्वांसाठी सक्तीचे आणि मोफत केले. शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही, हे त्यांचे विचार होते. मंदिरातील पैसा शिक्षणासाठी वापरला. सर्व जाती धर्मातील मुलांसाठी कोल्हापूरात वसतिगृहांची स्थापना केली.   मराठा बोर्डिंग, मुस्लिम बोर्डिंग, जैन बोर्डिंग, दलित बोर्डिंग, लिंगायत बोर्डिंग इत्यादी बोर्डिंगची स्थापना शाहू महाराजांनी केली.


     पुणे येथील श्री. शिवाजी मराठा सोसायटी, ऑल इंडिया श्री. शिवाजी मेमोरियल सोसायटी, डेक्कन एज्युकेशन सोसायटी, नाशिक येथील उदाजी मराठा शिक्षण संस्था, नागपूर येथील शिक्षण संस्था, चेन्नई येथील शिक्षण संस्था अशा अनेक शैक्षणिक संस्था उभारण्यात शाहू महाराजांचा पुढाकार होता.   रयत शिक्षण संस्था स्थापन करणारे कर्मवीर भाऊराव पाटील यांचे शिक्षण शाहू महाराजांच्या राजवाड्यावर राहून झाले. त्यांनी मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन दिले.


        राजर्षी शाहू महाराजांनी १९१७ साली विधवा पुनर्विवाहाचा कायदा केला.   १९१९ साली आंतरजातीय विवाहाचा कायदा केला. बाजारपेठ स्थापन केली. जयसिंगपूर शहराची स्थापना केली. त्यांनी भारतातील सर्वाधिक जलसाठ्याचे राधानगरी हे पहिले धरण भोगावती नदीवर १९०८ साली बांधले.   छत्रपती शिवाजी राजांचा जगातील पहिला अश्वारूढ पुतळा १९२१ साली  पुणे या ठिकाणी प्रिन्स ऑफ वेल्स यांच्या हस्ते उभारला. पहिले शिवचरित्र लिहिणाऱ्या कृष्णाजी अर्जुन केळुस्कर यांच्या पाठीशी ते खंबीरपणे उभे राहिले.


            १८९९ साली वेदोक्ताचा अधिकार नाकारणाऱ्या पुरोहिताची त्यांनी हकालपट्टी केली.   बहुजन पुरोहित तयार करणारी शिवाजी वैदिक शाळा त्यांनी सुरू केली.   डोणे नावाचे धनगर विद्वान  त्या शाळेचे  प्राचार्य होते.   भास्करराव जाधव यांनी *घरचा पुरोहित* नावाचे पुस्तक लिहिले. बहुजनांचा आणि ब्राह्मणांचा धर्म एक नाही, हे त्यांनी स्वतंत्र धर्माची स्थापना करून सिद्ध केले.   स्वतंत्र धर्मपीठावर त्यांनी सदाशिव लक्ष्मणराव पाटील बेनाडीकर या विद्वानाची नियुक्ती केली. 


             शाहू महाराजांनी आपल्या राज्यात कधी भेदाभेद केला नाही.   याउलट उपेक्षित, वंचित, भूमिहीन, अस्पृश्य, शेतकरी, कष्टकरी, श्रमकरी जातींना त्यांचा डावललेला हक्क अधिकार मिळावा, यासाठी १९०२ साली आरक्षणाची सुरुवात केली. भारतात आरक्षणाचा पाया घालणारा राजा म्हणजे शाहू महाराज होय. प्रशासनातील  एकाधिकारशाहीला त्यांनी पायबंद घातला.   त्यांनी सर्व जातींना प्रसासनात प्रतिनिधित्व दिले.   त्यांनी मराठा समाजालाही आरक्षण दिले की जे आजच्या व्यवस्थेने हिरावून घेतले.


             शाहू महाराज हे बुद्धिप्रामाण्यवादी होते, त्यांनी भविष्य, पंचांग, मुहूर्त कधीही पाहिला नाही.   भविष्य सांगण्यासाठी आलेल्या जोतिष्याला तुरुंगात डांबून त्याला बुद्धिप्रामाण्यवादाचे महत्व  पटवून दिले.   त्यांनी भाकडकथा, पुराणकथा नाकारून प्रतिगामी विचारांना नेस्तनाबूत केले.   त्यांनी ग्रंथप्रामाण्य नाकारले.


        राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या राज्यात कृषी क्षेत्रात आमूलाग्र क्रांती केली. नगदी पिकांना चालना दिली.   पन्हाळा टी-4 हा चहाचा वाण विकसित करून त्याची लागवड केली. तो चहा निर्यात होत असे.   त्यांनी शेतीत आधुनिकीकरण आणले. शेतीसाठी बाजारपेठ उभारली. पाणीपुरवठ्याची सोय केली. शेतीला जोडधंदा म्हणून अनेक उद्योगांची उभारणी केली.

                                     

     आपल्या राज्यात समता प्रस्थापित करण्यासाठी शाहू महाराजांनी आपले राजेपद पणाला लावले. ज्या जातींना गुन्हेगार ठरवण्यात आलेले होते, अशा जातीवरचे निर्बंध राजांनी उठवले.   त्यांना नियमित हजेरीतून मुक्त केले.   त्यांना आपल्या राज्याच्या संरक्षण खात्यात महत्त्वाच्या पदावरती नेमले.   अस्पृश्यता नष्ट व्हावी, यासाठी ते अस्पृश्याच्या घरी जेवले.   अस्पृश्यांना आपल्या राजवाड्यावर स्नेहभोजन ठेवले. अन्यायग्रस्त गंगाराम कांबळेला न्याय देऊन त्याला हॉटेल टाकून दिले.   त्या हॉटेलला प्रतिष्ठा प्राप्त व्हावी, यासाठी स्वतः शाहू महाराज आपल्या सहकाऱ्यांना घेऊन हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी जात असत. 

महार, मांग, चांभार इत्यादी पैलवानाबरोबर देशभरातून आलेल्या पैलवानांनी कुस्ती खेळावी म्हणून त्यांना जाट, सरदार, पंडित अशी नावे दिली. 

                                

      महिलांचा आदर सन्मान करणारे त्यांचे धोरण होते. विधवा पुनर्विवाह कायदा केला. त्यांना शिक्षण मिळावे यासाठी अनेक योजना सुरू केल्या. आपल्या कुटुंबातील स्त्रियांना शिक्षण दिले.   महाराणीच्या हस्ते धरणाचे उद्घाटन केले तर कन्या राधाबाई यांचे नाव धरणाला दिले.   तेच इतिहासप्रिद्ध राधानगरी धरण आहे.


           जातिभेद नष्ट व्हावा, यासाठी शाहू महाराजांनी आंतरजातीय विवाहाला चालना दिली.   याची सुरुवात त्यांनी स्वतःच्या कुटुंबापासून केली. त्यांनी आपली बहीण चंद्रप्रभादेवी यांचा विवाह इंदोरचे यशवंतराव होळकर यांच्या बरोबर निश्चित केला, तो पुढे राजाराम महाराजांनी लावून दिला, असे सुमारे २५ आंतरजातीय विवाह घडवून आणले, यातून त्यांनी मराठा- धनगर आणि इतर जाती एकमेकांचे विरोधक नसून नातेवाईक आहेत, हे सिद्ध केले. म्हणजे शाहू महाराज हे केवळ बोलके सुधारक नव्हते, तर कर्ते सुधारक होते,

                                  

       छत्रपतींची परंपरा जातीव्यवस्था मोडणारी व समता प्रस्थापित करणारी परंपरा आहे.   छत्रपतींची परंपरा जातीव्यवस्था पाळणारी विषमतावादी परंपरा नाही. छत्रपतींची परंपरा प्रगल्भ परंपरा आहे,  ती संकुचित नाही.


         शाहू महाराजांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या उच्च शिक्षणासाठी सर्वतोपरी मदत केली.   मूकनायक या नियतकालिकासाठी मदत केली. शाहू महाराज म्हणाले, "बाबासाहेब आंबेडकर हे देशाचे नेते आहेत आणि तेच खरे लोकमान्य आहेत". 

शाहू महाराजांनी बाबासाहेबांच्या मुंबई येथील घरी जाऊन त्यांचा सत्कार केला, याप्रसंगी शाहू महाराज म्हणाले "रमाबाई माझी धाकटी बहीण आहे, तुम्ही लंडनवरून परत येईपर्यंत मी तिला माहेरी कोल्हापूरला घेऊन जातो"  

                                 

     माणगाव आणि नागपूर येथील परिषदेत जाऊन शाहू महाराजांनी बाबासाहेबांना खंबीर पाठिंबा दिला. शाहू महाराजांनी बाबासाहेबांना सोनतळी कॅम्पवर स्नेहभोजन दिले आणि मानाचा जरीपटका देऊन सत्कार केला.   याप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात  "छत्रपतींनी मानाचा जरीपटका माझ्या मस्तकी चढविला, त्याचा मी सदैव सन्मान राखीन" 


           शाहू महाराजांच्या मुला-मुलींच्या लग्नात करवले म्हणून भटक्या विमुक्त, दलित जातीतील समवयस्क मुला-मुलींना सोबत घेतले होते, जेणेकरून विषमता नष्ट व्हावी व सामाजिक सलोखा निर्माण व्हावा, हे शाहू महाराजांचे धोरण होते.


          शाहू महाराजांनी आपल्या राज्यात हिंदू-मुस्लिम हा भेद केला नाही.   मुस्लिमांच्या शिक्षणासाठी त्यांनी मुस्लिम बोर्डिंगची स्थापना केली.   आपल्या राज्यातील गरिबातल्या गरीब मुस्लिमांना कुराण मराठी भाषेत वाचता यावे, यासाठी अरबी भाषेतील कुराणाचे मराठी भाषांतर करण्यासाठी पंचवीस हजार रुपयाची देणगी दिली.   शंभर वर्षांपूर्वीची ही रक्कम खूप मोठी रक्कम आहे. शाहू महाराजांनी पाटगावच्या मौनी बाबाच्या मठाच्या उत्पन्नातील रक्कम तेथील मुस्लिमांच्या मशिदीच्या बांधकामासाठी दिली, तर रुकडीतील पिराच्या देवस्थानाच्या उत्पन्नातील रक्कम तेथील अंबाबाई मंदिराच्या बांधकामासाठी व दिवाबत्तीसाठी दिली, इतका सामाजिक सलोखा शाहू महाराजांच्या राज्यात होता


          शाहू महाराजांनी शाहीर लहरी हैदर, चित्रकार आबालाल रहमान, गानमहर्षी अल्लादिया खाँसाहेब, मल्लविशारद बालेखान वस्ताद, बालगंधर्व यांना सर्वतोपरी मदत केली. शाहू महाराजांनी सामाजिक समतेसाठी आणि सामाजिक सलोख्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावले, 


         शाहू महाराजानी आपल्या राज्यात सर्वांचा विकास आणि शांतता प्रस्थापित व्हावी, यासाठी सनातनी व्यवस्थेविरुद्ध उघडपणे संघर्ष केला, परंतु आज सामाजिक वातावरण बिघडवले आहे, जातीजातीत आणि धर्माधर्मात विष पेरले जात आहे. ही बाब अत्यंत गंभीर आहे. सर्व समाज बांधवांनी एकोपा जपावा, हे शाहूचरित्र सांगते, 

                   

     शाहू महाराजांचा सामाजिक सलोखा आपण कायम ठेवणे, हेच खरे शाहू प्रेम आहे. शाहू राजांची जयंती (२६ जून) सणासारखी साजरी करा, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले आहे.   त्यांच्या विचारांचे आपण आचरण करूया.  आज शाहू महाराजांची जयंती(२६ जून) आहे. जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏 www.great-indian com
आणि www.vijayjob.in

लोकप्रिय पोस्ट