मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

महत्वाच्या लिंक IMP

शुक्रवार, १९ मे, २०२३

बाळशास्त्री गंगाधरशास्त्री जांभेकर

 

  दर्पणकार 

मराठीतील पहिल्या वृत्तपत्राचे संस्थापक बाळशास्त्री जांभेकर 

जन्म. ६ जानेवारी १८१२

बाळशास्त्री गंगाधरशास्त्री जांभेकर हे मराठी भाषेतल्या आद्य पत्रकारांपैकी एक पत्रकार होते. दर्पण हे मराठीतले पहिले वृत्तपत्र त्यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी सुरू केले.

प्राचीन वाङ्मयाचे बाळकडू व संस्कार घरातून मिळाल्यामुळे त्यांचे संस्कृत व मराठी विषयांचे अध्ययन वयाच्या तेराव्या वर्षी पूर्ण झाले. त्यामुळे ते मराठी लेखन, वाचन, व्यावहारिक गणित, तोंडी हिशोब, रामदास-तुकाराम इत्यादी चरित्र, वामन, मोरोपंत आदी प्रसिद्ध कवींच्या कविता व अमरकोश-पंचकाव्यामध्ये आठव्या वर्षी पारंगत झाले. त्यानंतर ते आंग्ल भाषेच्या अभ्यासासाठी मुंबईला आले. एल्फिन्स्टन यांनी २१ ऑगस्ट १८२२  रोजी मुंबई येथे दि बॉम्बे नेटिव्ह स्कूल, बुक अँड स्कूल सोसायटी नावाची शिक्षण संस्था काढली. त्या संस्थेच्या शाळेत बाळशास्त्रींनी प्रवेश घेतला. इंग्रज प्राध्यापकाने हात टेकावे असे नैपुण्य त्यांनी त्या परकीय भाषेत मिळवले. ते सर्व विद्यार्थ्यांमध्ये अग्रगण्य होते व शिक्षकांचे आवडतेही झाले. शिक्षणाशिवाय, विशेषत: पाश्चात्य देशांतील आधुनिक ज्ञानाशिवाय तरणोपाय नाही ही बाळशास्त्रींची भूमिका होती. गव्हर्नर लॉर्ड माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन १८२७ मध्ये सेवानिवृत्त होऊन विलायतेला परत गेल्यानंतर त्यांच्या स्मरणार्थ मुंबई शिक्षण मंडळी यांनी त्यांच्या नावाने एल्फिन्स्टन स्कूल सुरू केले.  



जांभेकर यांची प्रखर विद्वत्ता पाहून इंग्रज राज्यकर्त्यांनी एल्फिन्स्टन कॉलेजात त्यांची इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून नेमणूक केली. सतरा इंग्रज प्राध्यापकांच्या ताफ्यात ते एकमेव भारतीय प्राध्यापक होते. राष्ट्रीय नेते दादाभाई नौरोजी व गणिताचे प्रकांड पंडित केरूनाना छत्रे हे त्यांचे विद्यार्थी होते. त्या काळात मुंबईबाहेर सरकारी इंग्रजी व मराठी शाळा फार थोड्या होत्या. सन १८४४ पर्यंत पुणे, ठाणे, सुरत या तीन ठिकाणी इंग्रजी शाळा सुरू झाल्या होत्या. उपरोक्त प्रत्येक विभागासाठी मुख्य शाळा तपासनीस (ज्यांना सुपरिंडेंटेंट संबोधित असत) असे नेमण्यात आले. त्या पदावर बाळशास्त्री जांभेकर यांनीही दक्षिण विभागातील मराठी व कानडी शाळा तपासणीचे काम, वाहतुकीची साधने उपलब्ध नसतानादेखील चार वर्षे केले म्हणून ते पहिले मराठी शिक्षण अधिकारी होते. ‘बोर्ड ऑफ एज्युकेशन’ने चांगले प्रशिक्षित अध्यापक तयार करावेत अशी बाळशास्त्रींची कल्पना होती. युरोपीयन अधिकाऱ्यांनी ती कल्पना स्वीकारली आणि आचार्य बाळशास्त्रींच्या शिफारसीने १८४५ मध्ये ‘अध्यापक वर्ग’ (डी.एड., बी.एड. कॉलेज) सुरू केले गेले. त्यांचे पहिले संचालक म्हणून आचार्यांनीच काम पाहिले.




 मुंबईसारख्या दाट वस्तीत मोहनगरीत शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळावे, त्यांचे शीलसंवर्धन व्हावे या उद्देशाने आचार्यांनी मुंबईत त्यांच्या घराशेजारी वाडा भाड्याने घेऊन पहिले विद्यार्थी वसतिगृह सुरू केले. तेथे ते विद्यार्थ्यांच्या शिस्त, आरोग्य, संस्कार व शिक्षण यांकडे जातीने लक्ष देत. केवळ शिक्षणाचा प्रसार करून चालणार नाही, तर सनातनी आणि प्रतिगामी लोकांच्या मनावर बेगडी श्रद्धांचा जो कालबाह्य पगडा आहे तो हटवला पाहिजे. लोकांच्या भावना संवेदना विशाल-उदार झाल्या पाहिजेत यासाठी जांभेकर हिरीरीने काम करत. त्या विषयावर त्यांचा ‘Liberty of Sentiments’ हा लेख प्रसिद्ध आहे. त्यासाठी देशी भाषेत वृत्तपत्र असणे अत्यावश्यक आहे हे जाणून त्यांनी मराठीत पहिले वृत्तपत्र – दर्पण - सुरू केले. बाळशास्त्री यांनी ‘दर्पण’ प्रकाशित करण्यामागील आपली भूमिका १२ नोव्हेंबर १८३१ रोजी प्रॉस्पेक्ट (प्रस्ताव) या नावाने प्रकाशित केली. ‘दर्पण’चा पहिला अंक ६ जानेवारी १८३२ रोजी प्रसिद्ध झाला. ते द्विभा‍षिक वर्तमानपत्र होते. एकच वेळी इंग्रजी व मराठीत निघणा-या त्या पत्राच्या  पानातील दोन स्तंभात डावीकडचा स्तंभ इंग्रजी व उजवीकडच्या स्तंभात भाषांतर असे. त्या्स एकूण आठ पाने असत. जांभेकर यांनी वाचकांची मागणी वाढू लागल्यानी 'दर्पण साप्ताहिक' ४ मे १८३२ पासून सुरू केले. जांभेकर यांची संपादकीये विचारप्रवर्तक असत. ते सभ्य प्रतिष्ठित भाषेत सरकारवर सडेतोड टीका करत. ‘दर्पण’ वृत्तपत्र सुरू झाले तेव्हा ब्रिटिशांचे शासन होते आणि वृत्तपत्र नियंत्रण कडक होते ते  १८३५ नंतर थोडे शिथील झाले. त्यावेळी साक्षर वर्ग कमी होता. त्यामुळे वाचकांची संख्याही कमी होती. तरीही ‘दर्पण’चे त्या काळात तीनशे वर्गणीदार होते. त्या काळात ब्रिटिशांच्या नोकरीत असूनसुद्धा बाळशास्त्री यांनी सरकारला रूचो वा न रूचो, नि:स्पृहपणे विविध सामाजिक विषयांवर ‘दर्पण’मधून लेख, अग्रलेख लिहिले ते दूरदृष्टीचे आहेत. सनातन धर्मातील एकांतिक संन्यास प्रवृत्ती, अंधगुरूभक्ती, कर्मठ कर्मकांडे. चातुर्वर्ण्य, जन्मनिष्ठ उच्चनीचता, जातिभेद, धर्माचा अतिरेक इत्यादींबाबत विचारमंथन ‘दर्पण’मधून झाले. स्त्रियांवर लादलेली बंधने, बालविवाह, विधवाविवाह, पारतंत्र्य, केशवपन यांसारख्या गोष्टींमुळे समाजरचना चुकीच्या पायावर उभी आहे . त्यातील दोष काढले नाहीत तर पिढ्यान् पिढ्या ते सर्वांना भोगावे लागेल. त्यातून समाजाचा, धर्माचा, राष्ट्राचा विकास तर होणार नाही, पण शृंखलेमुळे अवनती होईल आणि त्याला पारतंत्र्याचे, गुलामीचे कायम स्वरूप येईल हे जांभेकरांनी ‘दर्पण’मधून सांगितले. ‘दर्पण’चा शेवटचा अंक २६ जून १८४० रोजी प्रसिद्ध झाला व ते बंद करण्यात आले. त्या अंकात 'लास्ट फेअरवेल' हे संपादकीय लिहून त्यांनी वाचकाचा निरोप घेतला. इंग्रजी राज्याबरोबर विद्या आली आणि धर्म व संस्कृतीसुद्धा आली. या बदलावर बाळशास्त्री व नाना शंकरशेठ यांनी जहरी टीका केली. पाश्चात्य विद्वत्ता व विज्ञान यांबद्दल त्यांना रास्त आदर होता पण मिशनरींच्या धर्मांतर धोरणावर त्यांनी कडाडून हल्ला चढवला. तत्कालीन असा एकही विषय नाही की ज्यास बाळशास्त्री जांभेकर यांनी स्पर्श केला नाही! बाळशास्त्री जांभेकर यांचा ज्योतिष व गणित या विषयांतील अधिकार फार मोठा होता




 

त्यांनी ‘शून्यलब्धि’ म्हणजेच Differential calculus या विषयावर मराठी भाषेतील पहिले पुस्तक लिहिले. 



बाळशास्त्री जांभेकर हे मराठीतील पहिल्याt वृत्तपत्राचे संस्थापक तर होतेच, सोबत ते मराठीतील पहिले मासिक ‘दिग्दर्शन’चे संस्थापक संपादक देखील होते. त्याचबरोबर पहिले मराठी असिस्टंट प्रोफेसर, ‘बॉम्बे नेटिव्ह लायब्ररी’ या मुंबईतील पहिल्या सार्वजनिक वाचनालयाचे संस्थापक, नेटिव्ह इंप्रुव्हमेंट सोसायटी या ‘लोकसुधारणा’ व्यासपिठाचे संथापक, पहिले मराठी शाळा तपासनीस, पहिल्या विद्यार्थी वसतिगृहाचे संस्थापक, कुलाबा वेधशाळेचे पहिले मराठी संचालक, ज्ञानेश्वरीची पहिली शिळाप्रतही (छापील प्रत) त्यांनीच १८४६ मध्येह प्रसिद्ध केली. याशिवाय पहिले दूरदृष्टीचे समाजसुधारक, महाराष्ट्राचे आद्यशिक्षण तज्ज्ञ, इतिहास संशोधक म्हणूनही त्यांचा उल्लेख अभिमानाने केला जातो. त्यांच्या फ्रेंच भाषेतील प्राविण्याबद्दल फ्रान्सच्या बादशहाकडून त्यांचा गौरव करण्यात आला होता. 

मा. बाळशास्त्री जांभेकर यांचे १७ मे १८४६ रोजी निधन झाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏 www.great-indian com
आणि www.vijayjob.in

लोकप्रिय पोस्ट