व्यक्तीला जीवनात विविध प्रकारे सहाय हवे असते. सहाय म्हणजे मदत, आधार! हा आधार असतो पैशाचा, श्रमाचा. परंतु याहीपेक्षा एक वेगळा आधार असू हकतो की, ज्यात पैसा किंवा श्रम खर्ची पडत नाहीत पण खर्ची पडतो फक्त विचार! हा विचार शब्दांच्या सहायाने आपण व्यक्त करतो; म्हणून त्यास आपण 'शब्दांचा आधार' असे संबोधतो.
वेलीला जसा वृक्षाचा आधार गरजेचा असतो, मुलांना आई-वडिलांचा विद्यार्थ्यांला शिक्षकांचा, अनुयायाला नेत्याचा, साधकाला गुरूचा तसे भांबावलेल्या, वैतागलेल्या, हताश झालेल्या, दुःखाने होरपळलेल्या मनाला शब्दाचा आधार फार मोठा वाटतो.
वृक्षाच्या आधाराने जशी वेल फोफावते तशी माता-पिता यांच्या 'आम्ही आहोत, चल पुढे' या शब्दांच्या आधाराने मुले जीवनातील चढ-उतारांशी मुकाबला करू शकतात. कधी कधी त्यांना मिळणाऱ्या छोट्या-मोठ्या विजयानेही आपण म्हणतो, 'शाबास, विजयी भव' लढाईवर जाणाऱ्या मुलाला आई जेव्हा ओवाळते तेव्हा तिच्या मुखातून बाहेर पडलेल्या 'औक्षवंत हो!" 'जयवंत हो!' 'कल्याण असो!' किंवा 'पुन्हा प्रयत्नाला लाग' अरे अपयश ही यशाची पायरी असते' अशा शब्दांचा आधार त्याला पृथ्वीमोलाचा वाटतो. या शब्दाच्या आधारानेच त्यांना प्रेरणा मिळते, स्फूर्ती मिळते. परिणामतः ते विजयाची वाटचाल करू शकतात.
या उलट कधी कधी संकटग्रस्तांचे अडचणीत सापडलेल्यांचे किंवा दुःखद प्रसंगी आपण एखाद्याचे सांत्वन करतो "या जगात तुम्हीच फक्त दुःखी आहात, अस का
तुम्हाला वाटतं?” अशा शब्दांच्या आधाराने आपण केलेल्या सांत्वनामुळे त्या व्यक्तीला, कुटुंबाला आधार मिळतो. हा शब्दांचा आधार मोठा वाटण्याचे कारण म्हणजे या शब्दांच्या मागे मोठी शक्ती उभी असते. त्यामुळे त्या असहाय, संकटग्रस्त व्यक्तीला आपण या जगात एकटे नाही, आपल्या पाठीशी कोणीतरी आहे, याची जाणीव होते व हीच भावना संकटातून पार पडण्यास त्या व्यक्तीस मदत करीत असते.
शब्दांचा आधार देताना आपल्याला विचार करावा लागतो, पैसा खर्च करावा लागत नाही. या विचारांच्या शब्दांच्या आधाराने मानवी जीवन फुलू शकते, निराशा संपते, प्रेरणा मिळते. म्हणूनच हा शब्दांचा आधार मौल्यवान होऊ शकतो
म्हणून अडचणीच्या वेळी द्या शब्दांचा आधार..........🙏🙏🙏🙏🙏🙏
.