blog html


knowledge is power ब्लॉग वरती शालेय माहिती , परिपत्रके , मासिके , विविध पुस्तके , प्रेरणादायी व्हीडीओ , शासन निर्णय , विविध योजना ,online पेमेंट सामान्य ज्ञान टेस्ट , वृत्तपत्रे, प्रेरणादायी लेख ,स्पर्धा परीक्षा टेस्ट ,स्कॉलरशिप परीक्षा टेस्ट यांची माहिती मिळणार आहे .


 

माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे धन्यवाद
मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

महत्वाच्या लिंक IMP

गोतावळा

 गोतावळा ......


           आज हा गोतावळा शब्द नव्या पिढीला माहित असेल की नाही असा प्रश्न पडतो. आजची परिस्थिती इतकी बदलली आहे की जो तो आपल्या स्वतःच्या कुटुंबापूरता संकुचित झाला आहे 

काका, आत्या, आजोबा, आजी, मावशी,मामा, मामेभाऊ, आत्येभाऊ ही नाती इतकी दूर गेली आहेत की अनेकांना या नात्यांची ओळख ही आहे की नाही , अशी शंका येते.

       चाळीस पन्नास वर्षांपूर्वी पर्यंत घर माणसांनी भरलेलं असायचं, घराला घरपण होतं. शेजारी पाजारी लोकांची ये- जा असायची. गल्लीतल्या त्या टोकाच्या जाधवांच्या घरची केलेली भाजी वाटीत घालून खालच्या गल्लीतल्या चव्हाणांच्या घरी पोहोचायची. जादा पाहुणे घरी आले की, साखर, च्याची पावडर (चहा पावडर), पीठ उसणवारीनं एकमेकांना दिलं घेतलं जायचं. माणसांमध्ये आपूलकी, प्रेम, माया, ममता, जिव्हाळा, आत्मियता होती. उगवतीच तांबडं फुटायला घराच्या अंगणात शेणाचा सङा पडायचा. पहाटेच्या आल्हाददायी वातावरणात पक्षांची कीलबील अन् गावातील मंदीरातून आरतीचा सूर आणि सुरेल घंटानाद मनाला प्रसन्न करायचा. भल्या पहाटे घरातल्या गृहलक्ष्मीची कामाची लगबग सुरू व्हायची, आंघोळ पाणी उरकून दिवस उजडायला सोनेरी कोवळी सुर्यकिरणं अंगणात पडायच्या वेळेला दारातल्या तुळशी वृंदावनातील हिरव्यागार कृष्णधवल तुळशीला पाणी आणि सुर्यदेवाला अर्ध्य देऊन मनोभावे नमस्कार व्हायचा. सकाळी सुर्य उगवतीला आला की , गोठ्यातील हंबरणारी वासरं अन् पान्हा सोडलेल्या गायींच्या गळ्यातील घुंगूरमाळांचा किणकिणाट वातावरणात प्रसन्नता निर्माण करायचा. आकडी दुधानं आणि दुधाच्या फेसाने प्रत्येकाच्या घरातील चरवी काठोकाठ भरलेल्या दिसायच्या.


           सुर्य डोक्यावर येऊ लागला की, घरातील वयस्कर आजीच्या बांगङ्याचा खूळ खूळ आवाज कानावर पडायचा, तीच्या हातातली रवी एका विशिष्ट लयीत मोठ्या गाडग्यातल्या गोडश्या दह्यावर गोलगोल फिरत रहायची, घरच्या दह्यातूंन कणीदार ताक तयार व्हायचं, निरसं‌ ताक घुसळून पांढराशुभ्र लोण्याचा भलामोठा गोळा जमा व्हायला वेळ लागायचा नाही. आजीच्या मागे मागे स्वंयपाक घरात म्यावं...म्यावं... करत शेपूट हलवत फिरणारी मनीमाऊ लोण्याच्या गोळ्याकडं बघत कानोसा घेत फिरायची. घरावरील छपराच्या सावण्यातनं (आता सावणं कालबाह्य झालं) सुर्याचा लख्खं प्रकाश घर उजळून टाकायचा. एव्हाना चुलीवर जर्मनच्या डिचकीत लोणी कढवायला ठेवलं जायचं. लोणी कढल्यावर तुपाचा घमघमाट अख्ख्या गल्लीभर व्हायचा. घरातली कर्तीधर्ती माणसं सकाळी सकाळी मळ्यात पोहोचलेली असायची. घरातील सुनाबाळा सासरे मामांजीच्या व सासूबाई आत्याचे चरणस्पर्श करून दिवसाच्या कामाला सुरुवात करायच्या. लहान मुलं उन्हं तोंडावर पडली की, आपसूकच वाकळातून (वाकळं किंवा गोधडीही आता कालबाह्य झाली आहेत.) आळोखेपिळोखे देत डोळं चोळत अंथरूणातून बाहेर पडायची. तान्ह्या बाळांच्या आया त्यांना जवळ घेऊन माजघरात पाजायला पदराआड घ्यायच्या. आंघोळीसाठी सकाळी सकाळी भरलेला पाण्याचा रांजण रीकामा व्हायचा. धुण्याचा भला मोठा बोचका न्हानीतनं घेऊन परटीणंमावशी गावतळ्याकङं निघायची.ती घरात आली की, पहिल्यांदा तिला चहापाणी, काहीतरी खायला दिलं जायचं, घरचं आणि बाहेरचं असा भेदभाव बिलकुल पहायला मिळत नव्हता. एकमेकांविषयी कमालीचे प्रेम, जिव्हाळा,आदर होता. अर्थात बैतेसुध्दा घरातली असल्यासारखी असायची. त्यांनी केलेल्या कामासाठी भरपूर मोबदला दिला जायचा. त्यामुळे ही नाती अधिक घट्ट होत होती. पैपाहूणे यांचे एकमेकांच्या घरात सर्रास येणं जाणं असायचं. प्रत्येकाची थेट स्वयंपाक घरात एन्ट्री असायची.

          घरातल्या कर्त्या माणसांचा सगळीकडेच दरारा असे, सर्वजण त्यांचा आब राखत असत. त्यांचा आदर करीत असत. कुटुंबातील संस्कार हे प्रत्येकाच्या वागण्यातून दिसून यायचे. आई - बाबा, काका - काकू , आज्जी - आजोबा, आत्या - मामा ,भाऊ - बहिणी , चुलत भाऊ ,चुलत बहीणी हा सगळा "गोतावळा " म्हणजे घराचे खरे वैभव होते. घराच्या ओसरीला बसून दिवसभराच्या कामाचे नियोजन केले जायचे. बैलाकङे कोण जाणार ? माळावर कोण ? नातेवाईकांच्या लग्नाला, कार्यक्रमाला कोण ? हे सगळं नियोजनानंतर घरातील कर्त्या माणसांकङून एकमेकांविषयीचे रूसवे - फुगवे दूर केले जायचे. मध्येच कोणाचे हट्ट पूरवण्यासाठी योग्य ती तजवीज केली जायची. तर मध्येच घरातील लग्नाला आलेल्या उपवरं मुलीच्या लग्नाची चर्चा रंगली की, मुली लाजून चूर व्हायच्या अन् तिथून आत माजघरात पळून निघून जायच्या. प्रत्येकाची सुख दु: ख समजून घेतली जायची. मोठ्या मनानं कौतुक केले जायचे. त्यामुळे मनं मोकळी मोकळी व्हायची. प्रत्येक जण कुटुंबासाठी राबायचा, खपायचा. तीस चाळीस सदस्य असलेली कुटूंबं गुण्यागोविंदानं नांदायची. 

       नवरा जेवल्याशिवाय बायकांना घास उतरत नसायचा. अपेक्षा कमी असल्याने माणसं सुखी समाधानी अन् आनंदी असायची. घरात एखादा छोटा मोठा समारंभ असला की आनंदाला उधाण यायचं. घराच्या भिंती ही बोलू लागायच्या. लहान मुलांमुलींची‌ घरभर खेळाची रेलचेल चालायची. कधी कधी बच्चेकंपनी इतका दंगा करायचीत की, घर जणू डोक्यावर घ्यायचीत. घरातल्या सुना स्वयंपाकात दंग असायच्या. सर्जा राजाची बैलजोडी बांधलेल्या बैलगाडीतनं मध्येच नांदायला गेलेली गल्लीतील एखादी लेक हातात हिरवागार चूडा भरुन अन् हिरव्याजर्द नऊवारी पातळ नेसून एखादी लक्ष्मी प्रगट व्हावी,तशी यायची. अन् मग घरातल्या प्रत्येकाच्या गळ्यात पडून भेटायची. आपूलकीचा स्पर्श नात्यातील वीण अधिक घट्ट करायचा. शेजारच्या आयाबाया हातातली कामं टाकून माहेरवाशिणीला भेटायला न बोलवता यायच्या. गालावर हात फिरवून बोट कडाकडा मोडून प्रत्येकजणी माया करायच्या . प्रत्येकीच्या काळजातून थेट ओठांवर मायेचे शब्द यायचे, विचारपूस केली जायची. गावातली लेक आली म्हणून सगळ्या मैत्रिणी गोळा व्हायच्या. माहेरपणासाठी आलेल्या लेकीचं आख्खा गाव कोडकौतुक करायचा. 

       आत्या मावशी ही नाती इतरांपेक्षा ही कांकणभर जवळची वाटायचीत. नणंद -भावजया मधील प्रेम अतूट होत. स्वार्थ अन् अहंकाराचा लवलेश ही नसायचा . दुपारी जेवणं झाल्यावर जात्यावर धान्य दळायला घरातल्या बायका बसायच्या, त्यावेळी जात्यावरच्या ओव्या आपसूकच ओठांवर यायच्या, एका सुरात गायिलेल्या ओव्या कानावर पडल्यावर‌ शेजारणी ही आवतण न देता जात्यावर येऊन बसायच्या. घ‌रच्या सुनेच्या काबाडकष्टाची जाण असायची. शेतावरून घरी आलेल्या मामांजीना तांब्याभर पाणी देताना सूनबाईच्या डोळ्यातून घळकनं अश्रू ओघळायचे. मग मात्र मायेनं सुनेच्या ङोक्यावरनं फिरवलेला हात बापाची आठवण करून द्यायचा. एकमेकांविषयीच्या सुख दु:खाना प्रत्येकाच्या मनात थारा होता. संध्याकाळच्या जेवणाची तयारी तिन्ही सांजेला सुरू व्हायची. संध्याकाळच्या‌ स्वयंपाकासाठी घरच्या मोठ्या बायकांची लगबग स्वयंपाकघरात सुरू झालेली असायची. घरातील प्रत्येक सदस्य आल्यावर ओसरीला पंगत बसायची. अन् पुन्हा घरातील विविध विषयांवर चर्चा व्हायची. बाप - लेक , नवरा - बायको , आज्जी - आजोबा नात्यांच्या पलीकडे जाऊन एकमेकांना प्रेम लावायचे. सुख- दु:ख वाटून घ्यायचे. 

   मोठी माणसं लहानांची थट्टामस्करी करायचे, त्यावेळी सगळ्या घरात एकच हश्या पिकायचा. दिवसभराचा शीणं निघून जायचा. त्यावेळच्या बायकांना नवऱ्याचा मूड आनंदी ठेवण्याची कला अवगत होती. त्यामुळे वातावरण खेळकर असायचे. यातून घराचं गोकुळ व्हायचं. संसार सोन्यासारखा असायचा. एकत्र कुटुंब ही चांगल्या संस्काराची केंद्रं होती. माणसात माणूसपण टिकून होतं. सुख - दु:ख रिते करायला अधिकाराचे अन् हक्काचे खांदे होते. नात्यातील प्रेमात अविट गोडवा होता. प्रत्येक क्षणाला आपलेपणाची किनार होती. या सगळ्या गोतावळ्यात शब्द अन् तत्वांना किंमत होती. एकमेकांविषयी विश्वासार्हता टिकून होती. कुटुंबासाठी प्रत्येक माणूस सुख दु:खाच्या प्रवासातील वाटेकरी होता. भरलेल्या घरातल्या एखाद्या माणसांना न परतीच्या वाटेकडे "एक्झिट" घेतली तर अशा दुःखद प्रसंगी माणसं माणसांना भरभक्कम आधार द्यायचीत.भावनांना वाट मोकळी करून द्यायला जो तो आपला पदर पुढे करायचा. त्याची कायम आठवण रहावी म्हणून त्यांच्या नावाने वर्षाला श्राद्ध घालायचे. पैपाहुण्यांसाठी जेवणावळी घातल्या जायच्या. रक्ताची नाती सोडाचं पण मानलेली नाती ही अशावेळी घरातून पाय काढायची नाहीत. जाती धर्माच्या पलीकडे ही नाती जपली जायची,जात, धर्म वेगवेगळा असलातरी त्याची पुसटशी सावली सुध्दा एकमेकांच्या संबंधांवर पडली जात नव्हती,

    ‌असा प्रेमाचा, जिव्हाळ्याचा आणि आपुलकीचा "गोतावळा" अलिकडच्या काळात दूर्मिळ व दुरापास्त झाला आहे, त्यामुळे समाजाची घडी विस्कटून गेली आहे. प्रत्येक माणूस एकटा एकटा पडला आहे. कुणाचा कुणाला आधार नाही. त्यातही पराकोटीचा स्वार्थ, आप्पलपोटेपणा आणि कमालीची स्पर्धा सुरू झाली आहे, प्रत्येक गोष्टीत इव्हेंट आणि बाजारीकरण झाले आहे, त्यामुळे असुरक्षितता व एकटेपणाचा फास दिवसेंदिवस गच्च आणि घट्ट होत चालला आहे, तो प्रत्येक माणसाला जाणवत आहे, पण सामाजिक परिस्थिती इतकी झपाट्याने बदलत आहे की, त्याला कुठलाच इलाज राहिलेला नाही,समाज दिशाहीन झाला आहे,मी आणि माझे यापलीकडे जाऊन पहायला कुणालाही वेळ नाही, त्यामुळे समाजाची संवेदनशीलता पुर्णपणे संपली आहे, माणूस माणसापासून दूर गेला आहे, त्यामुळे नातीगोती कुठल्या कुठे गडप झाली आहेत, हे भयानक वास्तव समोर आले आहे.

      "गोतावळा हा शब्दच कालबाह्य झाला आहे," हे नको असणारे सत्य स्विकारण्याशिवाय आता गत्यंतर राहिलेलं नाही.

ब्लॉग वरील सर्व पोस्ट वाचा.