मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

रविवार, २४ जुलै, २०२२

आयकर विवरण पत्रे

 #अर्थात

#आयकर_विवरणपत्र_भरताना

         

          आर्थिक वर्ष (सन2021-2022) 31 मार्च 2022 रोजी संपले. दंड न लागता यावर्षाचे विवरणपत्र भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2022 आहे. ही मुदत कदाचित वाढू शकेल कारण 1 एप्रिल पासून आपण कधीही हे विवरणपत्र भरण्यास पात्र असलो तरी, प्रत्यक्षात आपण अनेक कारणांनी ते भरत नाही. याचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे शेवटच्या तिमाहीत कापलेला कर भरण्यासाठी 15 मे पर्यंत अवधी असतो अनेकदा अत्यंत नामवंत कंपन्यासुद्धा हा कर अगदी शेवटच्या क्षणी भरतात त्यामुळे कापलेला कर आपल्याला मे अखेरीस दिसू लागतो. याच कारणाने नोकरदार व्यक्तींना मिळणारा फॉर्म 16 पगारदार व्यक्तींना जून महिन्यात देण्यात येतो. पगारदार व्यक्तींना आयकर मोजणीचे दोन पर्याय आहेत यातील नवीन पर्यायात अनेक सवलती वगळून 5% ते  30% अशी 6 टप्यात कर आकारणी होईल. हा पर्याय स्वीकारून फायदा होणाऱ्या व्यक्तींचे प्रमाण नगण्य आहे तेव्हा पारंपारिक पर्यायाचा स्वीकार करावा दोन्ही पद्धतीने कर मोजणी करावी आणि कोणती पद्धत स्वीकारावी ते विवरणपत्र भरण्यापूर्वी ठरवावे. यामध्ये नवीन पर्यायाने कर मोजणी केल्यास पुन्हा जुन्या पध्दतीकडे परत येता येत नाही हा धोका आहे तेव्हा यासाठी तज्ञांची मदत आवश्यकता असल्यास घ्यावी. 

       आयकर विभागाकडून आयकर विवरण पत्र भरण्यास ITR 1 ते 7 हे फॉर्म उपलब्ध आहेत यातील 5, 6, 7 नंबरचे फॉर्म हे कंपनी करदात्यासाठी असल्याने आपल्या उपयोगाचे नाहीत.

ITR 1 हा 50 लाख रुपयांहून कमी उत्पन्न असलेल्या वैयक्तिक करदाते आणि एचयूएफसाठी ज्यांना पगार पेन्शन व्याज घरभाडे डिव्हिडंड याशिवाय अन्य उत्पन्न नाही.

ITR 2 हा वरील करदाते ज्यांचे उत्पन्न 50 लाख रुपयांहून अधिक आहे किंवा उत्पन्न कमी आहे पण अल्प आणि दीर्घ मुदतीचा भांडवली नफा आहे.

ITR 3 हा फॉर्म व्यावसायिक उत्पन्न आहे याशिवाय पगार व्याज घरभाडे पेन्शन भांडवली नफ्यासह एकूण उलाढाल 2 कोटीहून कमी आहे जे लोक व्यवसायाचा हिशोब न ठेवता अंदाजित मोजणी करून करमोजणी करतात. 

ITR 4 हा 2 कोटीहून अधिक उलाढाल असलेल्या वरील सर्व व्यक्ती अविभक्त कुटुंब याशिवाय अन्य फॉर्म लागू नसणारे यांच्यासाठी आहे. यातील योग्य फॉर्मची खात्री करून घ्यावी, आपले आयकर विवरण पत्र स्वतः भरावे की व्यावसायिकांकडून भरून घ्यावे हा व्यक्तिगत प्रश्न आहे. आपण विवरणपत्र कसे भरावे याची माहिती आयकर विभागाच्या संकेतस्थळावर आहे याशिवाय थोडा शोध घेतल्यास अन्य ठिकाणी उपलब्ध आहे. जे लोक नियमितपणे स्वतःचे विवरणपत्र स्वतः भरतात त्यांची मदत घेता येऊ शकते.

       आपणास कर किती लागू शकतो याचा अंदाज घ्यावा. उत्पन्न करपात्र असो अथवा नसो आपले सर्व मार्गांनी होणारे या कालखंडातील उत्पन्न यासाठी विचारात घ्यावे उदा पगार, घरभाडे, ठेवींवरील व्याज, पी पी एफ वरील व्याज, अल्प दीर्घ मुदतीचा नफा, लाभांश, शेअर पुनर्खरेदीची रक्कम, व्यवसाय असल्यास त्यातून मिळालेले उत्पन्नइ., अन्य कोणत्याही मार्गाने मिळालेले उत्पन्न याची बेरीज करून त्यातून करमुक्त उत्पन्न,  कायदेशीर वजावटी इ. वजा करून सन 2021-2022 या आर्थिक वर्षासाठी सर्व मार्गाने मिळणारे एकूण करपात्र उत्पन्न ₹ 2 लाख 50 ते 5 लाख  रुपयांच्या आत असेल, तर आपणास कोणताही आयकर द्यावा लागत नाही. जर आपले वय 60 हून अधिक असेल, तर करमुक्त उत्पन्नाची मर्यादा ₹ 3 लाख ते 5 लाखचे आत व आपण अतिवरिष्ठ नागरिक असाल म्हणजेच आपले वय 80 पेक्षा जास्त असेल, तर ही मर्यादा ₹ 5 लाख एवढी आहे. लक्षात घ्या उत्पन्नावर कर आहे खर्चावर नाही (त्यासाठी GST आहे.) हे उत्पन्न ₹ 5 लाख रुपयांच्या आत असेल तर कलम 87 /A नुसार जास्तीत जास्त ₹ 12500/- ची करसवलत मिळते त्यामुळेच 5 लाख रुपयांच्या पर्यंत करपात्र उत्पन्नावर कोणताही कर द्यावा लागणार नाही त्याहून अधिक उत्पन्न असेल  तर यातील ₹ 2.5 लाख ते 5 लाखापर्यंतच्या करपात्र उत्पन्नावर 5% त्यावरील ₹10 लाख रुपयापर्यंतच्या करपात्र उत्पन्नावर ₹ 12500 + 20% आणि त्यावरील करपात्र उत्पन्नावर ₹  112500+ 30% या दराने आयकर लागतो. या एकूण करावर सरचार्ज म्हणून 4% दराने शिक्षण व उच्चशिक्षण कर द्यावा लागतो. ज्यांचे वार्षिक उत्पन्न ₹ 50 लाखांहून अधिक आहे त्यांना आपल्या उत्पन्नानुसार अधिक अतिरिक्त सरचार्ज द्यावा लागतो. हा एकूण करदायित्वांवरील कर आहे (Tax on tax) 60 वर्षांखालील करदात्यांना ₹ 5 लाखावर उत्पन्न असेल 2.5 ते 5 लाख आणि त्यापेक्षा अधिक वय असलेल्या जेष्ठ नागरिकांना ₹ 5 लाखावर उत्पन्न असल्यास 3 लाखावर असलेल्या उत्पन्नावर वरील दराने कर द्यावा लागून त्यांना 87/A नुसार मिळणारी सूट मिळणार नाही. याशिवाय पगारदार लोकांना सेक्शन 4/A नुसार ₹ 50000 ची प्रमाणित वजावट (Standard deduction) मिळेल. तसेच त्यांचा कापलेला अधिकतम व्यवसाय कर एकूण उत्पन्नातून वजा होईल.

आयकरासाठी ज्याप्रमाणे सर्व मार्गाने मिळणाऱ्या उत्पन्नाचा विचार केला जातो त्याचप्रमाणे विविध बचत, गुंतवणूक आणि खर्च यांना विहित मर्यादेत सूट दिली जाते.

यातील प्रमुख तरतुदी खालीलप्रमाणे -

1) विविध बचत गुंतवणूक योजना व खर्चांना मिळणाऱ्या सवलती : यामध्ये विहित मर्यादेत जमा केलेली रक्कम एकत्रित उत्पन्नातून कमी होत असल्याने एकूण करदायित्व कमी होते. आयकर अधिनियम 80/C, 80/CCC, 80/CCD एकत्रित मिळून जास्तीत जास्त दीड लाख रुपये सूट मिळू शकते.  

*80/C ची सवलत मिळणाऱ्या अनेक योजना व खर्च आहेत. कंसात योजनेवरील 1 जानेवारी 2022 ला मिळू शकणारे व्याजदर दिले आहेत. ते दर तिमाहीस बदलत असून 31 मार्च 2022 पर्यंत हेच व्याजदर राहतील. यामध्ये पी एफ वर्गणी 8.4%,वी पी एफ  8.4%,पी पी एफ (7.1%) मधील जमा केलेली रक्कम,एन एस सी (6.8%), एन एस सी व्याज, 5वर्ष मुदतीच्या करबचत मुदत ठेवी (जास्तीत जास्त 5.5 ते 6.5%), वरिष्ठ नागरिक बचत योजना (7.4%),सुकन्या समृद्धी योजना (7.6%), विमा हप्ते, राहत्या घराचे गृहकर्ज मूद्दल, रजिस्ट्रेशन खर्च, दोन मुलांचा शैक्षणिक खर्च, करबचतीच्या समभाग संलग्न योजना यांमध्ये  जमा/खर्च केलेली रक्कम यांचा समावेश होतो.

*80/CCC मध्ये विमा कंपन्या व म्युच्युअल फंडाच्या पेन्शन योजनांचा समावेश होतो.

*80/CCD मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्याच्या नवीन पेन्शन योजनेच्या वर्गणीचा समावेश होतो. यापैकी एक अथवा अनेक ठिकाणी जमा केलेली रक्कम जास्त होत असली, तरी एकूण सूट दीड लाख एवढीच मिळते. 

*सन 2015 पासून 80/*CCD(1B) नुसार एन पी एस मध्ये जमा केलेल्या ₹50000 रुपयांवर अतिरिक्त सूट मिळते.

अशाप्रकारे एकूण जास्तीत जास्त दोन लाख रुपये एवढी वजावट मिळू शकते.

2) आरोग्य, सामाजिक सुरक्षा आणि पुनर्वसन योजनांवर मिळणाऱ्या सवलती : यामध्ये आयकर कलम 80/D, 80/DD, 80/DDE, 80/DU यांचा सामावेश होतो. 

*80/D नुसार स्वतःच्या, जोडीदाराच्या आणि दोन मुलांच्या आरोग्य विम्याच्या हप्त्यापोटी भरलेल्या रकमेवर ₹25000 जमाकर्ता जेष्ठ नागरिक असेल तर ₹ 50000 पर्यंत सूट मिळते. त्याचप्रमाणे जमाकर्त्यावर अवलंबित पालकांसाठी भरलेल्या हप्त्यावर त्यांच्या वयानुसार अतिरिक्त 25 ते 50 हजार रुपयांची सूट मिळते. तेव्हा या कलमानुसार किमान ₹ 25 हजार ते कमाल 1 लाख रुपयांची सूट मिळू शकते.

*80/DD नुसार अवलंबित अपंग जोडीदार, मूल, पालक, भाऊ, बहीण यांचे वैद्यकीय उपचार, कल्याणकारी विमा योजनेचा भरलेला हप्ता यावर केलेला खर्च हा अपंगत्वाचे प्रमाणानुसार ₹ 75 हजार ते ₹ 1 लाख 25 हजार पर्यंत आहे असे गृहित धरून सूट घेता येते यासाठी खर्चाच्या पुराव्याची कोणतीही गरज नाही.

*80/DDB या कलमानुसार स्वतःसाठी, जोडीदारासाठी, मूल, अवलंबित भाऊ, बहीण, आई, वडील यांच्यावर काही विशिष्ट आजारावर केलेल्या खर्चाबद्द्ल वयानुसार ₹ 40 हजार ते 1 लाख रुपयांची सूट घेता येते. 

*80/DU या कलमानुसार अपंग करदात्यास त्याच्या अपंगत्वाच्या प्रमाणानुसार त्याच्या उत्पन्नातून ₹ 75 हजार ते 1 लाख 25 हजारांची सूट मिळू शकते. त्याचप्रमाणे अनेक राज्यात अपंग करदात्यांना आणि त्यांच्या पालकांना व्यवसाय कर (Profesitional Tax) माफ करण्यात आला आहे.

3) विविध कर्जावरील व्याजावर मिळणारी सूट : यामध्ये आयकर कलम 80/E, Section 24, यांचा समावेश होतो.

*80/E नुसार स्वतःसाठी, जोडीदारासाठी अथवा मुलांच्या उच्च शिक्षणासाठी घेतलेल्या कर्जावरील व्याज कर्ज घेतल्यापासून ८ वर्षांपर्यंत कोणत्याही मर्यादेशिवाय सूट मिळण्यासाठी पात्र आहे. 

*Section 24 नुसार गृहकर्जावरील व्याजाला जास्तीत जास्त 2 लाख रुपयांची व घरदुरुस्ती कर्जावर 30 हजार रुपयांची सूट मिळते.

4) विविध दान आणि मदतनिधीस मिळणारी सूट : यामध्ये कलम 80/G व 80/GGC यांचा समावेश होतो.

*80/G नुसार मान्यताप्राप्त संस्था, न्यास यांना दिलेल्या एकूण उत्पन्नाच्या 10% मर्यादेत 50 ते 100%सूट मिळते.

*80/GGC नुसार मान्यताप्राप्त राजकीय पक्षास दिलेल्या देणगीतून एकूण उत्पन्नाच्या मर्यादेत 50% पर्यंत सूट मिळते.

5) इतर काही कलमानुसार मिळणाऱ्या सवलती : यामध्ये 80/GG, 80/TTA यांचा समावेश होतो.

*80/GG मध्ये काही अटींची पूर्तता केल्यास दरमहा 5 हजार रुपये एवढी घरभाड्याची वजावट मिळू शकते.

*80/TTA या कलमानुसार बचत खात्यातील रकमेवर मिळालेले 10 हजार रुपयावरील व्याज 60 वर्षाच्या आतील करदात्यांना करमुक्त आहे एकूण ₹40000 चे आत व्याज असेल तर मुळातून करकपात केली जाणार नाही. 

*80/TTB नुसार वरिष्ठ व अतिवरिष्ठ नागरिकांस ₹ 50 हजार वरील व्याज करमुक्त आहे त्यांना 80/TTA ची सवलत मिळणार नाही.

या ठळक तरतुदींशिवाय -

★शेअर खरेदीविक्रीतून काही अटींसह अल्प मुदतीच्या भांडवली नफ्यावर मुळातून एस टी टी कापला असेल सवलतीच्या दराने 15%कर द्यावा लागेल.

★ ₹ 1 लाखांहून अधिक दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यावर काही अटींसह 10% कर द्यावा लागेल. 31 जानेवारी 2018 पर्यंत शेअरवरील दीर्घ मुदतीचा भांडवली नफा करमुक्त असल्याने हा नफा या दिवसाची सर्वाधिक किंमत किंवा खरेदी किंमत यातील सर्वाधिक, ती खरेदी किंमत म्हणून समजून काढण्यात येईल. 

★भांडवल बाजारातील कंपन्यांनी आणि 65% हून अधिक समभाग असणाऱ्या म्युच्युअल फंडाच्या योजनांनी दिलेला लाभांश आपल्या उत्पन्नात मिळवून त्यावर आपली करपात्रता निश्चित होईल. 

★भाड्याने दिलेल्या घराच्या भाड्यातून स्थानिक स्वराज्य संस्थेचा कर वगळून मिळालेल्या भाड्यातून 30% प्रमाणित वजावट मिळेल (सेक्शन 24) 

★ पेन्शन योजना चालवणारे म्युच्युअल फंड व विमा कंपन्या यांनी देऊ केलेल्या निवृत्ती वेतनावर अन्य मार्गाने मिळालेले उत्पन्न समजून प्रमाणित वाजवट मिळणार नाही.

★EPFO कडून मृत सदस्यांच्या जोडीदास मिळणाऱ्या निवृत्ती वेतनातून  33.33% अधिकम ₹15 हजार प्रमाणित वजावट मिळेल.  

★वेगवेगळ्या पायाभूत सुविधा पुरवणारे करमुक्त कर्जरोख्यावरील (Tax free infrastructure bonds) व्याज करमुक्त आहे. 

★पुनर्खरेदी केलेल्या शेअरवरील फायदा करदात्यांच्या हातात करमुक्त आहे (10/34A) 

           या तरतुदींशिवाय इतर अनेक तरतुदींमुळे आपली करदेयता लक्षणीयरित्या कमी होऊ शकते. वर फक्त सर्वसमावेशक तरतुदींचा विचार केला आहे. त्यांचा विचार करून आपली करदेयता निश्चित करावी. विवरणपत्र भरताना यातील आकडेवारी निश्चित करून भरल्यास किती करदेयता आहे त्याप्रमाणे कर भरावा लागेल की परत मिळेल ते समजेल. यासाठी 26 AS आणि AIS यातील तपशीलाशी पडताळणी करावी. जर कर भरावा लागत असेल तर तो भरावा. विवरणपत्र अपलोड करावे त्याची पावती मिळते विवरणपत्र आपणच भरले असून त्यातील तपशीलाची आपल्याला खात्री असल्याची पुष्ठता आधार संलग्न मोबाईलवर ओटीपी मिळवून करता येते. याबाबत सर्व माहिती  www.incometaxindiaefilline.gov.in या आयकर विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ती पहावी अथवा सनदी लेखपालासारख्या (CA) तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला घ्यावा.आपल्या करविषयक कोणत्याही शंकांचे निराकरण आपण www.taxguru.in या संकेतस्थळास भेट देऊन सुद्धा करु शकता.


©उदय पिंगळे

गुरुवार, २१ जुलै, २०२२

शिक्षक कोणाचा

 *शिक्षकांकडे उपद्रवमूल्य नसते आणि तातडीने दिसून येणारे उपयुक्ततामूल्यही नसते.इथेच सारी गडबड झालेली आहे.*

    

एकवेळ लोक इतर सरकारी बाबूंना नमस्कार करतील पण उठूनसुटून शिक्षकांना सतत अक्कल शिकवायला कमी करणार नाहीत. त्यांच्या पगारावर बोट ठेवतील. 

*सरकारी शाळा ही कुणालाही कधीही येऊन राग व्यक्त करण्याची चांगली सोय असते. शिक्षक उलट उत्तरं करत नाहीत, सरकारी नोकर आणि सुशिक्षित मनुष्य म्हणून काही मर्यादा पाळाव्या लागतात, त्या ते पाळत राहतात. त्यामुळे शिक्षक हे सॉफ्ट टार्गेट वाटतात समाजाला.* 

शिक्षण आणि बालमानसशास्त्राबद्दल काही कळो अथवा ना कळो, त्यावर भाष्य करणं फार सोपं असतं कुणाहीसाठी.ऐकून घेतल्याने नुकसान शिक्षकांचं होत नाही. पण जेव्हा शिक्षकांचं मानसिक स्वास्थ्य बिघडतं, त्याचा परिणाम समोरच्या विद्यार्थ्यांवर होत असतो हे मात्र नक्की.

अहो, नुसता उचलला खडू आणि लावला फळ्याला, म्हणजे झालं शिकवणं असं नसतं!

*मुलांना शिकवता शिकवता वर्षानुवर्षे शिक्षक सुद्धा काही नवनवीन गोष्टी शिकत असतात. शेकडो मुलं हाताखालून जातात तेव्हा मुलांच्या मानसिकतेचे, वर्तनाचे अनेक पैलू समजत जातात. हे शिकताना दरवर्षी शिक्षक नवा झालेला असतो, मागच्या वर्षीचा शिक्षक पुढच्या वर्षी आणखी विचारी आणि समृद्ध झालेला असतो. प्रत्येक मूल वेगळं असतं हे तो जाणतो, त्यामुळे वर्गातल्या सर्व मुलांना एकाच चमच्याने घास भरवण्याचा तो हट्ट करत नाही.* 

बराच काळ एकमेकांसोबत राहून शिक्षक आणि मुलांमध्ये घट्ट नातं निर्माण होत असतं, मुलं शिक्षकाला सरावतात आणि शिक्षकाला मुलं कळायला लागतात.

*झाडावरच्या सर्व कळ्या एकाचवेळी उमलत नाहीत, तशी सगळी मुलं कितीही नीट शिकवलं तरी एकाचवेळी प्रगत होत नाहीत, हे शिक्षकाला माहिती असतं. एकाच वर्गात राहूनही मुलांच्या शिकण्याच्या वेगवेगळ्या गतीशी कसं जुळवून घ्यायचं हे त्याला बरोब्बर कळतं.*

मुलं घरात पालकांशी जितकी बोलत नसतील तितकं वर्गात शिक्षकाशी बोलतात, आपलं सुखदुःख त्याच्याशी वाटून घेतात. मुलांना काय आवडतं, त्यांना कोणत्या गोष्टींनी असुरक्षित वाटतं, त्यांचा कल कोणत्या गोष्टींकडे आहे आणि त्यांना काय पुरवलं म्हणजे ती योग्य रीतीने घडू शकतील याचा चांगला अंदाज असतो शिक्षकाला. 

हे सगळं काम शाळेत हळूहळू घडत राहतं. विद्यार्थी म्हणजे कंपनी प्रॉडक्ट नसतात, मशीनमध्ये घातले की सगळेच एका छापाचे होऊन बाहेर पडतील. माणसं असतात ती जितीजागती, माणसांना वेगवेगळा स्वभाव असतो, क्षमता असतात आणि परिस्थिती असते. प्रत्येकजण वेगळ्या तऱ्हेने घडतो.

या सगळया गोष्टींशी जमवून घेत शिक्षक आपलं काम पुढे नेत असतो. शिक्षकांचं काम हे मानसिक, बौद्धिक स्वरूपाचं असतं, त्यात कंटाळा आणि थकवा या गोष्टी अधूनमधून डोकावणं अगदी साहजिकच आहे. बौद्धिक काम लवकर थकवून टाकतं. मोबाईलला जशी चार्जिंग लागते, तशी बौद्धिक काम करणाऱ्या व्यक्तींना विश्रांतीची गरज असते. अगदी नैसर्गिक आहे ते.

*इतर कोणत्याही सरकारी ऑफिसात तुम्ही जाता तेव्हा संबंधित कर्मचारी टेबलवर नसला तरी तुम्ही त्याला अरेरावीची भाषा करत नाही, आपलं काम होईपर्यंत गोड बोललं पाहिजे हे धोरण तुम्ही ठेवता. शिक्षक मात्र जरा पाचदहा मिनिटे इकडेतिकडे झाल्यावर कसं काय आभाळ कोसळतं? शिक्षकांना चोरांसारखी वागणूक का देतात लोक?*

शैक्षणिक कामांसोबत अगदी सुट्टीतसुद्धा अनेक अशैक्षणिक कामं शिक्षकांकडून शासन करवून घेत असतं, त्याबद्दल पालकांना कल्पना सुद्धा नसते.

चालू तासिका डिस्टर्ब करून कधीकधी तातडीने कागदोपत्री माहिती शिक्षकांकडून मागवली जाते. नाही आवडत कुणालाच हातातलं शिकवण्याचं काम टाकून कागद खरडत बसायला, मोबाईलवर ऑनलाईन माहिती भरत बसायला. असंख्य कसरती कराव्या लागतात शिक्षकाच्या नोकरीत.

*शिक्षक शाळांमध्ये शिकवतात म्हणजे त्यांच्याजवळ उच्चशिक्षण, प्रशिक्षण आणि अनुभव अशा तिन्ही गोष्टी असतात, नोकरीला लागणं एकवेळ सोपं असेल, पण शिक्षकाच्या नोकरीत टिकून राहणं ही सोपी गोष्ट नव्हे.नका उठसूट उपदेश करू शिक्षकांना, त्यांना त्यांचं काम करू द्या. आपल्या पाल्याबाबत आपल्याला काही समस्या असतील तर शिक्षक आनंदाने संवाद साधायला तयार असतात. ते करा, स्वार्थी व्हा, आपल्या मुलांची उत्तमोत्तम प्रगती व्हावी यासाठी हट्ट धरा शिक्षकांकडे, आपल्या मुलांचं कल्याण करून घेण्याचा तो छान मार्ग आहे.*

आपल्या पाल्याला आवर्जून विचारा, तुला तुझे शिक्षक आवडतात का, आवडत नसतील तर त्या शिक्षकांशी जरूर संपर्क साधा, त्यांच्या संबंधांत काय बिनसतं आहे हे समजून घ्या, त्यावर मार्ग काढा.

*मुलाला वर्गात करमत नसेल, शिक्षक आवडत नसतील तर खरोखरच गंभीर गोष्ट आहे ती.पण मुलं त्या शिक्षकासोबत आनंदी असतील, तर ठेवा ना विश्वास त्याच्यावर!*

आणि आपली मुलं शाळेत शिकत नसतील तर नका जाऊ शाळांमध्ये चौदा वेळेस डोकवायला, डिस्टर्ब होते तिथली व्यवस्था. दुसऱ्या कुणाच्या तरी मुलांचं नुकसान होतंच ना त्याने! *आपल्या गावची शाळा, तिची प्रगती झाली पाहिजे म्हणून अवश्य जा शाळेत, पण गेल्यावर भसकन वर्गात नका घुसू, मुलांचं लक्ष विचलित होतं.मुख्याध्यापकांशी चर्चा करा,त्यांच्याशी बोलून गोष्टी ठरवा, छानच आहे ते.*

गावात उत्तम शैक्षणिक वातावरण तयार करणं, आपल्या गावच्या शाळा आणि शिक्षकांचे हात बळकट करणं हे पुढे जाऊन आपल्याच गावाच्या फायद्याचं ठरतं.

*एखाद्या गावात फारच मानसिक त्रास झाला तर सरकारी शिक्षक बदली करून दुसरीकडे जातात, त्याने नुकसान त्या शिक्षकांचं होत नाही, मुलांचं होतं हे लक्षात घ्या.*

त्यात हा कोरोना कंबरडं मोडून गेलाय शिक्षण व्यवस्थेचं, सैरभैर झालंय सगळं. सर्वांनाच त्यातून सावरायचं आहे.

*पालकांनी मुलांसाठी थोडं स्वार्थी व्हायला हवं.* 


*म्हणजे कसं? तर आपल्या गावात आहे त्या शाळेला आणि शिक्षकांना चांगल्या पद्धतीने सपोर्ट करायला हवा, सामंजस्याने शाळेचा विकास करत त्यातून आपल्या गावचं शैक्षणिक वातावरण मजबूत करत रहायला हवं.*

✡️✡️✡️✡️✡️✡️✡️

मंगळवार, १९ जुलै, २०२२

संत सावतामाळी

 📜 १९ जुलै इ.स.१२९५

संत सावता माळी यांना पुण्यतिथि निमित्त विनम्र अभिवादन



सावता माळी हे संत ज्ञानदेवांच्या काळातील एक प्रसिद्ध संत होते. त्यांचा जन्म इ. स. १२५०  भेंड .ता.माढा. जि.सोलापूर हे सावतोबांचे गाव होय. सावता माळी यांच्या आजोबांचे नाव देवु माळी होते, ते पंढरीचे वारकरी होते. त्यांचे वडील पूरसोबा आणि आई हे धार्मिक वळणाचे होते, पूरसोबा शेतीचा व्यवसाय सांभाळून भजन-पूजन करीत व पंढरीची वारी करीत असत.

कर्म करीत रहाणे हीच खरी ईश्वर सेवा आहे अशी शिकवण सावता माळी यांनी दिली. वारकरी संप्रदायातील एक जेष्ठ संत म्हणुन त्यांचा लौकिक आहे. ते विठ्ठलाचे परम भक्त होते. ते कधिही पंढरपूरला गेले नाहीत असे म्हटले जाते की खुद्द्द विठ्ठलच त्यांना भेटायला त्यांच्या घरी जात असे. प्रत्यक्ष ते कर्ममार्गी संत होते.त्यांनी अध्यात्म आणि भक्ती,आत्मबोध आणि

लोकसंग्रह, कर्तव्य आणि सदाचार याची बेमालूम सांगड घातली. ईश्वराला प्रसन्न करून घ्यावयाचे असेल तर जप, तप यांची आवश्यकता नाही तसेच कुठे दूर तीर्थयात्रेला जाण्याचीही गरज नाही; केवळ ईश्वराचे अंत:करणपूर्वक चिंतन केल्यास आणि श्रद्धा असल्यास ईश्वर प्रसन्न होतो आणि दर्शन देतो असा सावता माळी यांनी विचार मांडला

ईश्वराच्या नामजपावर जास्त भर दिला. ईश्वरप्राप्तीसाठी संन्यास घेण्याची किंवा सर्वसंगपरित्याग करण्याची गरज नाही. प्रपंच करतानाच ईश्वर प्राप्ती होऊ शकते, असे म्हणणार्‍या सावता महाराजांनी त्यांच्या मळ्यातच ईश्वर पाहिला.

”कांदा मुळा भाजी l अवघी विठाबाई माझी ll

लसूण मिरची कोथिंबिर l अवघा

झाला माझा हरी ll ”

सावता महाराज म्हणतात – भक्तीमध्येच खरे सुख आणि आनंद आहे. तीच विश्रांती आहे.

सावता म्हणे ऐसा भक्तिमार्ग धरा l

सावता माळी यांनी नरहरी सोनार आणि सेना न्हावी यांच्याप्रमाणेच आपल्या व्यवसायातील वाक्यप्रचार, शब्द अभंगात वापरले.तत्कालीन मराठी अभंगाच्या भाषेत नव्या शब्दांची ,नव्या उपक्रमांची त्यामुळे भर पडली. कर्म करीत राहणे हीच खरी ईश्वर सेवा आहे.अशी शिकवण वारकरी सावता माळी यांनी दिली.वारकरी संप्रदायातील एक जेष्ठ संत म्हणून त्यांचा लौकिक आहे.आजही पंढरपूरच्या श्री.विठ्ठलाची पालखी वर्षातून एकदा खास त्यांना भेटावयाला येत असते. सावता माळी हे कर्तव्य आणि कर्म करीत राहणे हीच खरी ईश्वर सेवा अशी प्रवृत्ती मार्ग शिकवण देणारे संत आहेत .श्री विठ्ठल हेच त्यांचे परमदैवत होते. अध्यात्म ,भक्ती, आत्मबोध आणि लोकसंग्रह, कर्तव्य, सदाचार याची बेमालूम सांगड त्यांनी घातली. धर्माचरणातील अंधश्रद्धा, कर्मठपणा, दांभिकता व बाह्य अवडंबर याबाबत त्यांनी कोणाचीही भीडभाड ठेवली नाही. त्यावर सतत कोरडे ओढले.अंत्यशुद्धी ,तत्त्वचिंतन, सदाचार, निर्भयता ,सहिष्णुता इत्यादी गुणांची त्यांनी भलावण केली. ईश्वराला प्रसन्न करून घ्यावयाचे असेल तर योग ,होम, जप ,किर्तन, व्रतवैकल्ये या साधनांची बिलकूल आवश्यकता नाही. केवळ ईश्वराचे अंतःकरणपूर्वक चिंतन हवे आहे .सावता माळी शेत सोडून कधीही पंढरपूरला आले नाहीत, असे मानले जाते. आजही संत सावता महाराजांची पालखी आषाढी वारीला पंढरपूरला येत नाही तर, आषाढी वारी झाल्यावर पांडुरंगाची पालखी संत सावता महाराज यांना भेटायला येते. आषाढ वद्य चतुर्दशी हा सावता महाराजांचा समाधी दिन .तर अमावस्या हा काल्याचा दिवस. काल्याच्या दिवशी पंढरपूर वरून निघालेली पांडुरंगाची पालखी अरण येथे आल्यावर दहीहंडी फोडून उत्सवाची सांगता होते.

दिनांक 19 जुलै इ.स.१२९५ रोजी संत सावता महाराज अनंतात विलीन झाले. एकाच जागी स्थीर राहून अंधार्‍या रात्री लोकांना अचूक मार्गदर्शन करणारे, धैर्याने वाटचाल करण्याचे प्रोत्साहन देणारे, एका जागी स्थीर राहून विठ्ठल भक्तीचा दीप लावूण उजळणारे , सावता महाराजांचे पावन चरित्र, प्रेरक व्यक्तिमत्व आणि प्रभावी कर्तृत्व यांची उज्वल यशोगाथा लाख-मोलाची ठेव आहे.

लोकप्रिय पोस्ट